ट्रम्प- बस नाम हि काफी है

डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे मोठे बिलंदर अध्यक्ष. ते स्वतःच नाव विकून पैसे कमावतात. त्यांच्या कंपनीचे नावदेखील ट्रम्प ऑर्गनायझेशन आहे. ट्रम्प हे खरं तर अमेरिकेतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक. त्यांना भारताच्या बांधकाम क्षेत्रात प्रचंड रस आहे. जगातल्या इतर कोणत्याही देशापेक्षात त्यांचे भारतात जास्त हितसंबंध गुंतलेले आहेत. भारतात किमान पाच तरी बांधकाम व्यवसायात त्यांचे हितसंबंध असल्याचे त्यांनीच जाहीर केलेलं. सध्या मुंबई पुणे बंगलोर अशा शहरांपुरता मर्यादित असलेल्या ट्रम्प यांना भारतभर “ट्रम्प” या व्यवसायाचा विस्तार करायचा आहे. भारतात सध्या त्यांचे पाच प्रकल्प चालू आहेत पण हे खूप कमी लोकांना माहिती असते कि त्या साठी ट्रम्प हे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करत नाहीत, उलट त्यांचं नाव वापरण्यासाठी बांधकाम व्यावसायिकच त्यांना पैसे देतात.

आज घडीला त्यांच्या नावाने चालू असलेल्या प्रकल्पांचे मूल्य किमान १.५ अब्ज डॉलर्स इतके महाकाय आहे. आज भारतातील सगळे मोठे बांधकाम व्यावसायिक त्यांच्याशी हात मिळवणी करायला उत्सुक आहेत. ट्रम्प ऑर्गनायझेशनचे स्थानिक विकसकांशी ब्रँड-परवाना करार आहेत ज्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात रॉयल्टी उत्पन्न होते.

मुंबई मध्ये ट्रम्प टॉवर्स नावाची ७५ मजली लक्झरी निवासी प्रकल्प मुंबईतील लोअर परळ येथील लोढा ग्रुपच्या सहकार्याने चालू आहे. हा प्रकल्प  २०१८ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते, या प्रकल्पातील एका अपार्टमेंटची किंमत मात्र ९ कोटी रुपये आहे. रहिवाशांना मिळणार्‍या अनेक फायद्यांपैकी एक फायदा असेल खासगी जेट सेवेमध्ये प्रवेश मिळवायचा आणि “ट्रम्प कार्ड” जे ट्रम्प यांच्या जगभरातील हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये विशेष सुविधा देते त्याचे सदस्यत्व. या लोढा कंपनीचे मालक हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत  हे विशेष. गुडगाव मध्ये ट्रम्प यांचे आयआरईओ आणि एम ३ एम अश्या दोन विकासकांसोबत करार झाले आहेत. कलकत्त्यात युनिमार्क नावाच्या संस्थेने देखील त्यांचे नाव वापरायला मोठ्या प्रमाणात पैसे देण्याचे मान्य केले आहे.

पुण्याच्या कल्याणी नगर भागात पंचशील रियल्टीच्या सहकार्याने बांधण्यात आलेल्या या प्रकल्पात प्रत्येकी एक मजला एक अपार्टमेंट असलेले प्रत्येकी २३ मजल्यांचे दोन टॉवर आहेत. पंचशील हा चोरडिया बंधूंचा उपक्रम, हे चोरडिया शरद पवार यांच्या खास मर्जीतले व्यावसायिक आहेत.

बॉलिवूड अभिनेते ऋषीकपूर आणि रणबीर कपूर यांनी प्रत्येकी १३ कोटी रुपयांमध्ये ६१०० चौरस फूट भागातील एक अपार्टमेंट खरेदी केले आहे. शेजारच्या प्रकल्पांच्या तुलनेत या प्रकल्पाला सुमारे ६० टक्के किंमतीचा प्रीमियम मिळाला आहे. थोडक्यात काय महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप जिंकलं काय किंवा राष्ट्रवादी ट्रम्प यांना त्यांची रॉयल्टी मिळतच राहणार आहे.

म्हणूनच तर ट्रम्प- बस नाम हि काफी है 

सारंग खटावकर हे आर्थिक घोटाळे विषयक लिखाण करणारे तज्ज्ञ आहेत, त्यांनी भारतातल्या अनेक घोटाळ्यांच्या अन्वेषणात महत्वाची भूमिका निभावली आहे.  आर्थिक घोटाळे शोधायचा त्यांना किमान १० वर्षांचा अनुभव आहे आणि विमा घोटाळ्यांवरील पुस्तकाचे ते लेखक आहेत. रेगटेक टाईम्स साठी ते नियमित लिखाण करतात.