पेण अर्बन सहकारी मधील अफरातफर

बँकेच्या संचालक मंडळाने ११९ जणांना कागदपत्रांची पूर्तता न करताच जवळपास ७३४ कोटी रुपयांचे बोगस कर्ज वितरण केले. त्यामुळे ७५ वर्षांची पंरपरा असणारी ही बँक अडचणीत सापडली. बँकेचे एकूण १ लाख ९३ हजार ६४१ खातेदार आहेत. या खातेदारांच्या बँकेच्या १८ शाखांमध्ये ६३२ कोटी ५० लाख रुपयांच्या ठेवी आहेत. प्रामुख्याने शेतकरी, शिक्षक, कर्मचारी, आदिवासी, शिक्षण संस्था, पतसंस्था, नगरपरिषदा यांचे पैसे त्यात अडकले आहेत.

२३ सप्टेंबर २०१० रोजी पेण अर्बन बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर रिझव्‍‌र्ह बँकेने र्निबध घातले. लेखापरिक्षण अहवालामध्ये सातत्याने ‘अ’ श्रेणी मिळवणारी ही बँक अडचणीत आली. ७०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आणि पावणेदोन लाख ठेवीदारांच्या पायाखालची जमीन सरकली. आज या घटनेला आठ वर्षे लोटली आहेत. मात्र, ठेवीदारांच्या ठेवींचा आणि बँक घोटाळ्याचा तिढा काही सुटलेला नाही. लाखो रुपयांच्या ठेवी अडकलेले ठेवीदार तर हलाखीचे जीवन जगत आहेत. आज ना उद्या आपले पैसे परत मिळतील, या आशेवर आला दिवस ढकलत आहेत. उसनवारीकरून दैनंदिन गरजा भागवत आहेत.

न्यायालयीन लढाईबरोबरच या प्रकरणाचा ठेवीदारांकडून शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. यासंदर्भात अनेक आंदोलनेही आजवर करण्यात आली आहे. पण कोरडय़ा आश्वासनापलीकडे त्यांच्या हाती फारसे काही लागलेले नाही. बँकेच्या थकीत कर्जाची वसुली होताना दिसत नाही. जप्त केलेल्या मालमत्तांच्या विक्रीलाही गती मिळालेली नाही. बुडालेल्या पैशातून पनवेल,पेण, पाली, रोहा , राजस्थान इथे ज्या जमिनी विकत घेण्यात आल्या आहेत त्या विकून ठेवीदारांचे पैसे सहज परत करता येऊ शकतात. परंतु ही प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू आहे.

बँक घोटाळ्याची चौकशी विविध पातळ्यांवर सुरु आहे. यात स्थानिक पोलीस, सहकार विभाग, सक्तवसूली संचालनालय, सीबीआय आणि आरबीआय या यंत्रणांचा समावेश आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सहकार सचिवांनी विशेष कृती समितीची स्थापना केली आहे. पण या समितीच्या नियमीत बैठका होत नसल्याच्या तक्रारी आहेत.

आता सक्तवसुली संचनालयाच्या कारवाईमुळे या प्रकरणाला पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठेवीदारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. शिशीर धारकर आणि प्रेमकुमार शर्मा यांच्या अटकेनंतर बँकेच्या ४३ संचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Avatar
सारंग खटावकर हे आर्थिक घोटाळे विषयक लिखाण करणारे तज्ज्ञ आहेत, त्यांनी भारतातल्या अनेक घोटाळ्यांच्या अन्वेषणात महत्वाची भूमिका निभावली आहे.  आर्थिक घोटाळे शोधायचा त्यांना किमान १० वर्षांचा अनुभव आहे आणि विमा घोटाळ्यांवरील पुस्तकाचे ते लेखक आहेत. रेगटेक टाईम्स साठी ते नियमित लिखाण करतात.