रेगटेकटाईम्स – गुलाबी पत्रकारितेची वर्षपूर्ती

इकनॉमिक टाईम्स, बिझनेस स्टँडर्ड, द हिंदू बिझनेस लाईन, फायनान्शियल एक्सप्रेस, मिंट ही भारतातील काही अग्रगण्य आर्थिक वृत्तपत्रे. फायनान्शियल टाईम्स, द वॉल स्ट्रीट जर्नल ही या क्षेत्रातली काही आंतरराष्ट्रीय नावे. यांतील बरीच पत्रे काहीशा गुलबट रंगाच्या कागदावर छापण्यात येतात म्हणून त्यांना पिंक प्रेस असे संबोधतात. मराठी मध्ये गुलाबी वृत्तपत्रांचा प्रयोग अनेकदा झाला आहे पण कोणत्याच वर्तमानपत्राला गुलाबी पत्रकारितेत म्हणावं तस यश मिळालेलं नाही.

रेगटेकटाईम्स’ हे रूढार्थाने गुलाबी वर्तमान पत्र नाही कारण ते गुलबट कागदावर छापले जात नाही किंवा ते छापलेच जात नाही.

रेगटेक टाईम्स ची सुरवात मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ज्या उद्देशाने केली गेली तो उद्देश गुलाबी वृत्तपत्रांचाच आहे. आर्थिक, कायदेशीर आणि तंत्रज्ञान या विषयांवर लिखाण करणे हाच खरं तर या वृत्तस्थळाचा उद्देश.
या विषयांवर आम्ही जागतिक पातळीवर अनेक व्यवसायिकांपर्यंत पोचलो, आज अनेक जागतिक कॉन्फरन्सेस मध्ये आम्ही मीडिया पार्टनर असतो, एक भांडवल बाजारातल्या सट्टेबाजीचा विषय सोडला तर रेगटेकटाईम्स वर वर्षभरात अनेक आर्थिक घडामोडींवर उहापोह केला गेला. आंतरराष्ट्रीय व्यापारात मनी लॉण्डरिंग कसे घडते यावर चर्चा झाल्या, मी स्वतः इराण, कोरिया आणि चीन या तीन देशांच्या व्यापारी लॉण्डरिंग बद्दल लेख लिहले.
वैश्विक अर्थकारण हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय ठरला. गेल्या वर्षात आम्ही बँक आणि  वित्त संस्थांच्या जोखमी बद्दल संशोधन पत्रिका पण तयार केल्या.
आमच्या दृष्टीने सर्वात महत्वाची घटना वर्ष संपता संपता घडली, सप्टेंबर महिन्यातच रेगटेकटाईम्सने मराठीमध्ये पदार्पण केलं. आम्हाला अनेक मराठी लेखकांची साथ मिळाली आहे.
पुण्यातील नूमवि मधील दोन तज्ञ् लेखकांची साथ आता मराठी मध्ये लिखाण करण्यासाठी मिळणार आहे. सारंग खटावकर आणि राजेंद्र कुलकर्णी हे दोन आर्थिक घोटाळ्यांवरील विषयांचे तज्ञ् या वर्षी पासून आमच्या उपक्रमासोबत सोबत जोडले गेले आहेत. मनापासून सांगतो, मराठी मध्ये जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला तो कधीच इंग्लिश लेखांना मिळाला नाही. या वर्षात मराठी मधून अनेक अर्थविषयक गोष्टींवर लेखन करूच पण मराठी मधल्या लेखकांना माझी विनंती आहे कि त्यांना त्यांची मतं मांडायची असल्यास एक संपन्न व्यासपीठ आता मराठी मध्ये उपलब्ध आहे. फेसबुक किंवा ई-मेल च्या माध्यमातून लेखक माझाशी संपर्क करू शकतात.